विमा पॉलिसीच्या नावाखाली उच्चभ्रू डॉक्टरांना दिड कोटींचा गंडा
पुणे : विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो, असे सांगून वेगवेगळ्या 18 बँकांमधील 41 बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून एका डॉक्टरची तब्बल 1 कोटी 49 लाख 44 हजार 400 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 2017 पासून सुरु होता. याप्रकरणी बिबवेवाडीत राहणार्या एका 57 वर्षाच्या डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मेल आयडीसी कॉल करून साधला संपर्क
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांनी 2013 मध्ये 3 विमा पॉलिसी उतरवली होती. या पॉलिसीबाबत यांनी चौकशी करताना त्यांना इंटरनेटवर एक नंबर मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क साधला होता. तो नंबर सायबर चोरट्यांचा होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी डॉक्टरांना वेगवेगळ्या मेल आयडीवरुन तसेच प्रत्यक्ष कॉल करुन संपर्क करत होते.त्यांना पॉलिसीचे 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे परत मिळवून देतो, असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वारंवार वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले. त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासने देऊन त्यांना पैसे भरायला भाग पाडले. अशा प्रकारे त्यांच्याकडून सायबर चोरट्यांनी 18 वेगवेगळ्या बँकांमधील 41 खात्यांमध्ये 1 कोटी 49 लाख 44 हजार 400 रुपये भरायला भाग पाडून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.

