माजी मंत्री खडसे म्हणाले : माजी आमदार अरुण पाटील भाजपात गेल्यानेच करावा लागला पराभव

राष्ट्रवादी जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार


जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवल्यानंतर पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यात रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा आणि पक्षाच्या सभासद नोंदणीच्या नियोजनासाठी शनिवारी पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हा बैठक झाली. याप्रसंगी खडसे म्हणाले की, जिल्हा बँक निवडणुकीत यावल, रावेर मतदारसंघात करावे लागलेले चमत्कार हा राजकारणाचा भाग आहे. माजी आमदार अरुण पाटील हे भाजपमध्ये गेल्यात जमा असल्याने त्यांचा पराभव करावा लागला. बँकेत राष्ट्रवादी स्पष्ट बहुमतात आहे. बँकच नव्हे तर मनपातही भाजपला आपणच धक्का दिला आहे. या पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकट्याच्या बळावर लढू शकते हे नेत्यांना सिद्ध करून दाखवणार असल्याचेही खडसे म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी, माजी मंत्री एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, साहेबराव पाटील, मनीष जैन, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, दूध संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मोरे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे, बँकेचे संचालक संजय पवार, नाना राजमल पाटील, घनश्याम अग्रवाल, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, महिला अध्यक्षा वंदना चौधरी, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्षा मंगला पाटील उपस्थित होते.



शेतकर्‍यांना आता रोखीने कर्ज
बँकेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांची भेट घेतली. पक्षाची ताकत असल्याने आगामी निवडणूक स्वबळावर लढू द्या, अशी विनंती त्यांना केली आहे. बँकेवर सर्वाधिक संचालक असल्याने पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीचाच अध्यक्ष असेल. अध्यक्ष कुणीही झाला तरी शेतकर्‍यांना एटीएम ऐवजी रोखीने कर्ज देण्याचा पहिला निर्णय घेतला जाईल, असे संचालक डॉ.सतीश पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचा जिल्ह्यात स्वबळाचा नारा
राष्ट्रवादी जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार या बैठकीत राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात नेमकी काय-काय समीकरणे बदलतात याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !