हनी ट्रॅप : व्यापार्‍याकडून उकळले अडीच लाख रुपये


कोल्हापूर : ‘हनीट्रॅप’ करीत एका व्यापार्‍याला लुटण्यात आल्याची तक्रार शनिवारी रात्री उशीरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली. या व्यापार्‍याला संगणमताने कट रचून ऑक्टोबर 2019 ते मे 2021 पर्यंत वेळोवेळी सुमारे अडीच लाख रुपायांना गंडा घालण्यात आला. गुंडाच्या टोळीचा मोरक्या सागर माने याच्या सहा जणांच्या टोळीने नियोजनबद्द कट करुन मैत्रीचा बहाणा करून हा ट्रॅप घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी टोळीचा म्होरक्या सागर पांडूरंग माने (32, रा. कात्यायणी कॉम्प्लेक्स, कळंबा) याच्यासह विजय यशवंत मोरे (36, रा. व्हन्नूर, ता. कागल), सिया मोरे, तिचा भाऊ म्हणून सांगणारा अनोळखी तरुण, फारुख बाबासाहेब शेख (32, रा.महाराणा प्रताप चौक), विजय उर्फ पिंटू शंकर कुलकुटगी (39 रा. दौलतनगर, राजारामपूरी) या सहाजणांवर गुन्हा दाखल आहे.

विश्वास संपादन करीत केले ब्लॅकमेल
सिया मोरे नावाच्या महिलेने एका बड्या व्यापार्‍याचा मोबाईल नंबर उपलब्ध करुन त्याच्याशी प्रथम व्हॉटसपवर मेसेज चॅटींग करुन भुरळ घातली. त्यानंतर तिने त्याला भेटण्यासाठी बाहेर बोलवले. दोघांनी एका हॉटेलमध्ये चहा घेतला, त्यावेळी महिलेने विश्वास बसेल असेच वर्तन केले. पुन्हा भेटण्यासाठी बोलवून तीने त्यांना शारिरिक लगड करण्याचा आग्रह केला. पण व्यापार्‍याने तिला दाद न देता सोबत गप्पा मारुन दुचाकीवरुन शहरात फिरवले. यावेळी सागर मानेसह त्याच्या टोळीतील पाचजणांनी त्यांना रस्त्यात अडवले. दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण केली. दुसर्या एका लाल रंगाच्या मोटारीत जबरदस्तीने घालून दुसर्या ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. पोलिसात बलात्काराची केस नोंदवण्याची धमकी देऊन प्रकरण मिटवण्यासाठी रोख रकमेचा तगादा लावला. त्यानंतर टोळीतील सदस्यांनी व्यापार्‍याकडून दोनवेळा 50 हजार रुपये, एकदा 60 हजार तर एकदा 90 हजार रुपये घेतले. पैशाची पिळवणूक झाल्याने व्यापार्‍याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हे सर्व गुन्हेगार हे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीप्रकरणी कारागृहात आहेत. लवकरच त्यांच्याकडून ताबा घेतला जाईल, असे पोलीस अनिल गुजर यांनी सांगितले.

सहावा ‘हनीट्रॅप’ उघड, आणखी शक्यता
आठवडाभरात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमोद जाधव यांच्या सुचनेनुसार ‘हनीट्रॅप’ करणार्‍या गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. आतापर्यत जुना राजवाडा, शाहुपूरी, शिरोली एमआयडीसी, कागल, गोकुळ शिरगाव व आता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण सहा तक्रारी दाखल झाल्या. यापैकी तीन ‘हनीट्रॅप’ हे माने टोळीकडून घडले आहेत. गुंडांच्या टोळ्याकडून जिल्ह्यात मोठ्या संख्येने व्यापार्‍यांना लुबाडण्याचे ‘हनीट्रॅप’ झाल्याने ते हळूहळू उघड होऊ लागले आहेत. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जात असल्याने तक्रारदारांनी भयमुक्तपणे तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !