वरणगावात करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आंदोलन
कर वाढ रद्द न केल्यास 6 डिसेंबरपासून जनआंदोलन : सुनील काळे
वरणगाव : वरणगाव नगरपरीषदेने शहरातील नागरीकांवर बेसुमार करवाढ केली असल्याने नागरीक संतप्त झाले असून नगरपरीषदेची शाळा नसतांना शैक्षणिक कर, वृक्ष कर, घनकचरा कर, शौचालय कर, रोजगार हमी करख, अग्निशमन गाडीसाठी कर आकारण्यास सुरूवात केली आहे. हा एक प्रकारे वरणगावकरांवर महाविकास आघाडी सरकारने आसूड उगविला असून त्याविरुद्ध वरणगावात भाजपा मैदानात उतरली आहे. करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी व याबाबतचा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात नगरपरीषदेवर धडक देवून आंदोलन करण्यात आले. 6 डिसेंबरपर्यंत करवाढ रद्द न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, प्रणिता पाटील-चौधरी, सुभाष धनगर, हाजी अल्लाउद्दीन सेठ, रमेश पालवे, मिलिंद भैसे, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, कृष्णा माळी, संदीप माळी, शेख कलमोद्दीन, मुस्लिम भाई अन्सारी, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, शकील शेख, डॉ.सादिक, कामगार नेते मिलिंद मेढे, ईरफान पिंजारी, डॉ.नाना चांदणे, कमलाकर मराठे, बबलू शेख, राहुल माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी नगरपरीषदेवर धडक दिली.


6 डिसेंबरपासून जनआंदोलनाचा इशारा
यावेळी नगरपरीषद अधिकार्यांनी करवाढ शासनाच्या आदेशानुसार झाल्याचा दावा केला. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रशासनाला धारेवर धरून 6 डिसेंबरच्या आत करवाढ रद्द करून देत असलेल्या नोटीसा परत बोलविण्यात याव्या व तसे न केल्यास 6 डिसेंबरपासून जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला. यावेळी प्रशासन अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, कर निरीक्षक आझाद पटेल यावेळी उपस्थित होते.