धक्कादायक ! : शाही थाली पडली चक्क एक लाख रुपयांना
औरंगाबाद : एका भोजन थाळीवर दोन थाळी फ्री अशी जाहिरात भामट्यांनी फेसबुकला दिल्यानंतर या जाहिरातीतील अमिषाला बळी पडून एक सर्वसामान्य व्यक्ती एक लाख रुपयाला फसला आहे. फेसबुकवरील शाही भोज थाळीच्या बाय वन गेट टू फ्री या जाहिरातीला भुलून बाळासाहेब ठोंबरे या शेतकर्याला बुकिंगसाठी त्यात दिलेल्या क्रमांकावर फोन करणे चांगलेच महागात पडले. थाळी बुकिंगसाठी मोबाइल क्रमांकही दिलेला होता. त्यावर ठोंबरे यांनी फोन लावला. समोरून बुकिंग केवळ ऑनलाइन होते, असे सांगण्यात आले. त्याच्यावर विश्वास ठेवून ठोंबरे यांनी स्वतःसह क्रेडिट कार्डची सर्व माहिती दिली. तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांकही सांगितला. त्यानंतर 300 रुपयांमध्ये मिळणार्या थाळीऐवजी खात्यातून 99 हजार 890 रुपये कट झाले. एक वेळा नाहीतर बुकिंग झाली नाही म्हणून दोन वेळा ओटीपी मागितला आणि लाखभराची फसवणूक झाली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
