खळबळजनक ! : 70 हजारांची लाच स्वीकारून एएसआय पसार : महिला पोलिस उपनिरीक्षक मात्र जाळ्यात
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात एसीबीच्या सापळ्याने उडवली खळबळ
पुणे : अत्याचाराचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी एक लाखांची मागणी करीत 70 हजारांवर तडजोड करणार्या महिला पोलिस उपनिरीक्षकांसह एएसआयवर पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगवी पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला खरा मात्र लाचेची रक्कम स्वीकारीत एएसआयने दुचाकीवरून पळ काढल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके (28) यांना अटक करण्यात आली तर सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई पसार झाले आहेत. एसीबीकडून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
लाच मागणी झाली सिद्ध
42 वर्षीय पुरूष तक्रारदाराविरोधात सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल असून या अर्जाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक सोळुंके यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 व 26 नोव्हेंबर रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर लाच पडताळणी अंती उपनिरीक्षक सोळुंके यांच्या सांगण्यावरून सहा.उपनिरीक्षक अशोक देसाई यांनी तडजोडीअंती 70 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

अन लाचेची रक्कम घेवून सहा.उपनिरीक्षक फरार
गुरुवारी दुपारी सांगवी पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला. सहा.उपनिरीक्षक अशोक देसाई यांनी तक्रारदाराकडून 70 हजार रुपयांची लाच स्वीकारली व त्याचवेळी इशारा प्राप्त होताच एसीबीचे पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सरसावताच आरोपी देसाई यांनी लाच रक्कमेसह दुचाकीवरून धूम ठोकली. पथकाने आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.
यांनी रचला होता सापळा
पुणे एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, सहा.पोलिस उपनिरीक्षक मुश्ताक खान, हवालदार नवनाथ वाळके, वैभव गिरीगोसावी, पूजा पागिरे आदींनी हा सापळा रचला.
