12 सराफांच्या दुकानातून अंगठ्या लांबवल्या : अट्टल चोरट्या महिलेला पुण्यात बेड्या
पुणे : सेल्समनचे लक्ष विचलीत करून महागड्या अंगठ्या लांबवणार्या महिलेला अखेर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. हडपसर पोलिसांनी शहरातील अशा 12 चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत शिवाय महिलेकडून सहा लाख 23 हजार रुपयांच्या 12 सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या. पूनम परमेश्वर देवकर (42, रा. बिबवेवाडी, पुणे) असे अटकेतील महिला आरोपीचे नाव आहे. महिलेने हडपसर, कोथरुड, रविवार पेठ, चाकण, चिंचवड, भोसरी, सहकारनगर येथील चंदुकाका सराफ, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, रांका ज्वेलर्स, मलबार ब्ल्यु स्टोन अशा नामांकित सराफ दुकानात तिने चोर्या केल्या आहेत.
आधी केले सेल्समन म्हणून काम
पूनम देवकर ही 2005 – 06 मध्ये लक्ष्मी रोडवरील एका दुकानात सेल्समन म्हणून कामाला होती. तेथे काम करीत असताना चोरी केल्याने तिच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सराफी दुकानातील कामाचा अनुभव असल्याने सोन्याचे दागिन्यावर स्टीकर कसे लावायचे याबाबत तिला माहिती होती. त्याचा गैरफायदा घेत तिने सोन्याच्या अंगठ्या चोरल्याचे उघड झाले आहे.

अशी करायची हातचलाखी
दुकानात गेल्यावर ती सोन्याचे अंगठ्या पाहण्याचा बहाणा करीत. त्यादरम्यान कधी पाणी व चहाची मागणी करुन सेल्समनचे लक्ष विचलित करीत असे. आणखी सोन्याच्या अंगठ्या दाखविण्यास सांगून मुळ सोन्याची अंगठी तिचे डाव्या हातातील मोबाईलचे खाली लपवून त्यासारखीच दिसणारी बनावट सोन्याची अंगठी त्यावर यापूर्वीचे ठिकाणाहून चोरुन आणलेले सोन्याचे अंगठीचे लेबल लावून ती बनावट अंगठी सोन्याचे अंगठीचे ट्रे मध्ये ठेवून देत असत. ट्रे मध्ये असलेल्या अंगठ्या सर्व जागेवर दिसत असल्याने तिची ही चोरी लवकर समजून येत नसे. काही दिवस गेल्यानंतर दागिन्यांची पाहणी करीत असताना घडलेला प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघडकीस आल्यावर फसवणूक केल्याचे सराफांच्या लक्षात येत असे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे राजू अडागळे व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली.
