एस.टी.चा संप : मुक्ताईनगर तालुक्यात शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास


मुक्ताईनगर : राज्य शासनात एस.टी.महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी महिनाभरापासून एस.टी.कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिल्यानंतर ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. एस.टी.संपामुळे आबालवृद्धांसह प्रवासी वर्गासोबतच शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. अलिकडेच 1 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. एस.टी.बंद असल्याने खाजगी वाहनांमध्ये गुरे कोंबावीत या पद्धत्तीने प्रवाशांची कोंबून व मनमानी पद्धत्तीने भाडे आकारून वाहतूक सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या जीव टांगणीला लागला आहे. पोलिस प्रशासनानेही कारवाईबाबत चालढकल केल्याने अवैध वाहतूकदारांचे अधिकच फावताना दिसून येत आहे.

आता संपाचा तिढा सुटण्याची अपेक्षा
पहिली ते सातवीचे वर्ग सुमारे दिड वर्षानंतर सुरू झाले असलेतरी ग्रामीण भागातून शहरी शाळांमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण रोडावले आहे. एस.टी.संप न मिटल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य शासनाने तत्काळ एस.टी.संपाचा तिढा सोडवून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांसह विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !