आधी पत्नीची केली हत्या नंतर मद्यपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई : मद्यपी पतीनेनवी मुंबईत पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःदेखील नाशिकमध्ये जात आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कविता वाघ (30) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
घरगुती वादातून पत्नीची केली हत्या
नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांनी पती रमेश वाघ याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. कविता वाघ नेरुळ सेक्टर 10 मध्ये पती आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास होत्या. आरोपी पती रमेश वाघ यास मद्यपानाचे व्यसन असल्याने गुरुवारी दोन्ही मुले नातेवाईकांच्या घरी गेली असताना आरोपी पतीने पत्नी कविताचा गळा दाबून निर्घृण खून केला. बायकोची हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर नाशिकला जाऊन विष प्राशन करत त्याने स्वतःचंही आयुष्यही संपवण्याचा प्रयत्न केला मात्र कविताच्या नातेवाईकाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

आरोपी पतीविरोधात गुन्हा
गुरुवारी रात्री उशिरा नेरुळ पोलिसांनी आरोपी रमेश वाघ याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. नाशकातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलीस आरोपी रमेश वाघला नाशिकमधून अटक केली जाणार असल्याचे समजते.
