मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून 200.77 कोटींचे उत्पन्न
पार्सल उत्पन्नात मध्य रेल्वेचे अव्वल स्थान : किसान रेल्वेमुळे नाशवंत मालाची दूरवरच्या बाजारपेठेपर्यंत वाहतूक
भुसावळ : एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये पार्सल महसूलात प्रथम क्रमांकाचे स्थान पक्के केले आहे. मध्य रेल्वेला नोव्हेंबर 2021 महिन्यात पार्सल द्वारा 26.37 कोटी महसूल प्राप्त झाला तर एप्रिल-नोव्हेंबर 2021 या कालावधीत पार्सल महसूल 200.77 कोटी प्राप्त झालेा. गतवर्षीच्या याच कालावधीपेक्षा 182 टक्के अधिक आहे. एप्रिल ते नोव्हेंबर-2021 या कालावधीत 4.64 लाख टन वाहतूक पार्सलद्वारा करण्यात आली. पार्सल वाहतुकीतील वाढ मुख्यत्वे नाशवंत वस्तूंची वाहतूक देशाच्या दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत किसान रेलच्या यशस्वीपणे चालवून केली जात असल्यामुळेच होत आहे.
किसान रेल्वेच्या 808 फेर्या
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये (एप्रिल ते नोव्हेंबर), किसान रेलने 2.06 लाख टन वाहतूक करून विविध गंतव्यस्थानांवर 581 फेर्या केल्या आणि रु. 79.53 कोटींचा महसूल मिळवला. किसान रेलच्या सुरूवातीपासून आतापर्यंत किसान रेलच्या 808 फेर्या चालविण्यात आल्या आहेत. ज्यामधून 2.78 लाख टन वाहतूक करण्यात आली.
मालाची वाहतूक रकणे सोपे : महाव्यवस्थापक
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, रेल्वेने पार्सल वाहतूक हा ग्राहकांसाठी उपलब्ध सर्वात सुरक्षित, जलद आणि पर्यावरणास अत्यत अनुकूल पर्याय आहे. मध्य रेल्वेने आपल्या सर्व विभागांमध्ये व्यवसाय विकास युनिट स्थापन करून केलेल्या प्रयत्नांमुळे व्यावसायीक, व्यापारी आणि डीलर्सना त्यांच्या मालाची त्वरीत वाहतूक करणे सोपे झाले आहे.
किसान रेल्वे ठरतेय समृद्धीचे इंजिन
किसान रेलमधील पार्सल वाहतूक प्रामुख्याने सांगोला, मनमाड, नाशिक, भुसावळ, रावेर, सावदा ते दानापूर, मुझफ्फरपूर, दिल्ली (आदर्शनगर), शालिमार आदि ठिकाणी होते. सोलापूर विभागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिरची, लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, नाशिक विभागातील कांदा, भुसावळ विभागातील केळी, नागपूर विभागातील संत्री, इतर फळे आणि भाजीपाला दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या दूरच्या बाजारपेठेत किसान रेलद्वारे त्वरित, ताजे आणि सुरक्षितपणे पोहोचते. किसान रेल्वेद्वारे मालाची वाहतूक करणार्या शेतकर्यांना मोठ्या बाजारपेठेसह चांगला महसूल, उत्पादनाला चांगला भाव, जलद वाहतूक, किमान वाया जाणारा माल असा मोठा फायदा होतो. किसान रेल हे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी विकास आणि समृद्धीचे इंजिन बनले आहे.
सहा वर्षांसाठी भाडेपट्टा करार
अलीकडेच, गोधनी (नागपूर) ते न्यू तिनसुकिया दरम्यान सहा वर्षांच्या कालावधीसाठी पार्सल कार्गो एक्स्प्रेस ट्रेनचा नवीन भाडेपट्टा करार करण्यात आला आहे. मुंबई ते शालिमार दरम्यान वेळापत्रकानुसार पार्सल विशेष ट्रेन धावत असून दररोज 355 टन पार्सल वाहून नेत आहे आणि चालू वर्षात अंदाजे रु. 28.30 कोटी उत्पन्न प्राप्त झाले आहे. रेल्वे दुधाचे टँकर नागपूर ते दिल्ली दरम्यान नेले जात असून त्यातून आर्थिक वर्ष 2021-22 नोव्हेंबर पर्यंत रु. 132 लाख उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या दीड वर्षात पार्सल वाहतुकीसाठी 22 नवीन स्थानके उघडण्यात आली आहेत. त्यात गेल्या वर्षीपासून केवळ कोविड काळात उघडलेल्या 19 स्थानकांचा समावेश आहे.


