वरणगावातील कामे निकृष्ट : शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन
वरणगाव : शहरात निकृष्ट दर्जाची कामे करून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केला आहे. वरगावकरांच्या भावनांशी खेळून अनेक निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली आहे. एक उत्कृष्ट नमुना म्हणून वरणगाव येथील आदर्श शाळेजवळील गणपती नगराजवळील रोडवरील ढापा ठरला असल्याचे ते म्हणाले. या ढाप्याचे काम दोन वर्षापूर्वीच झाले असून आता तो पूर्णतः बसलेला आहे. हा ढापा मुख्य रस्त्यावर असून अनेक वाहनांची नागरीकांची वर्दळ या रस्त्यावरून असते. शेजारीच शाळा असल्याने अनेक विद्यार्थी सदर रस्त्यावरून ये-जा करतात मात्र धापा तुटलेला असल्याने अनेक लहान-मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत.
सर्वच कामे निकृष्ट झाल्याचा आरोप
स्थानिक रहिवाशांनी आपली तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडे मांडल्याने त्यांनी भेट दिली असता नागरीकांनी आपल्या समस्या मांडल्या. रस्त्याचे तसेच गटारीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. संबंधित ढापा दुरुस्त करण्याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी आश्वासन दिले व दोन दिवसात काम सुरू करण्याची ग्वाहीदेखील दिली. पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराविरुद्ध त्वरीत कारवाई करून संबंधिताला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरीकांनी केली.


यांची होती उपस्थिती
यावेळी सचिन सरोदे, सुभाष पाटील, रामा बोंडे, शैलेंद्र बोरोले, भंगाळे आप्पा यांच्यासह संतोष रेडकर, कैलास पाटील, इथे, अतुल पाटील, संतोष माळी, राजेंद्र पर्से, सागर वाघ, सागर लोंढे, अशोक ढाकणे, भारंबे, धांडे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, गणपती नगर, जगदंबा नगर, सरस्वती नगर येथील नागरीक उपस्थित होते.
