राज्यात लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान : म्हणाले….!


मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरीएंट जगभरात धुमाकूळ घालत असताना भारतात जोमात पसरत आहे. त्यातच महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 21 वर पोहोचल्यानंतर जनतेत भीती पसरली असताना आता पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येते की काय? असा प्रश्न जनता उपस्थित करीत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ओमायक्रोनची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झाले असले तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं. या संदर्भात परीस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रुग्णसंख्या सातत्याने वाढतेय
आता भारतातही कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरीएंट वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. गुरुवार, 2 डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून 6 डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 21 पर्यंत पोहोचली आहे.



पुण्यातही शिरकाव
राज्यात डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 7 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला 24 नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्रॉन बाधित फिनलँड येथून परतला होता. परदेशातून आलेल्या 100 टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केलं जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणार्‍या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत.

राज्यात निर्बंध लावणे अशक्य : आरोग्य मंत्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन संदर्भात आरोग्य मंत्री म्हणाले की, राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल, परीस्थिती पाहून व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्रसरकारशी चर्चा करुनच लॉकडाऊनचा निर्णय होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. तसेच राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

नियम पाळणे हाच पर्याय
ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरात वाढत असताना आता देशातही मोठ्या वेगाने सापडू लागले आहेत. ओमायक्रॉनमुळे लसीचे दोन डोस घेतलाला व्यक्तीही संक्रमित होत आहे. याचाच अर्थ तुम्ही लस घेतली असेल तरी देखील ओमायक्रॉन तुम्हाला बाधित करू शकतो. यामुळे कोरोनाचे नियम पाळणे, काळजी घेणे या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !