भुसावळातील जुन्या आठवणींना दिला विद्यार्थ्यांनी उजाळा
भोळे महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा : विद्यार्थी म्हणाले, जीवनातील प्रगतीत महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा
भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे रविवार, 5 डिसेंबर रोजी कोरोना नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले. 1994 मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मेळाव्याला हजेरी देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर मिळालेली संस्काराची शिदोरी ही जीवनाला कलाटणी देणारी ठरली व जीवनातील प्रगतीत या शिदोरीचा सिंहाचा वाटा असल्याची भावना उच्च पदावर गेलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सिनेट व्यवस्थापन परीषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रमुख वक्ते म्हणून ब्लूमबर्ग या प्रतिष्ठित अमेरीकन संस्थेची फेलोशीपप्राप्त पत्रकार टेकचंद सोनवणे (पुणे) होते. प्रथमतः कै. दादासाहेब दे.ना.भोळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ.संजय बाविस्कर यांनी स्नेह मेळावा आयोजनामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
यांनी व्यक्त केले मनोगत
दिशा फाउंडेशनचे दिनेश भंगाळे, पाणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे समन्वयक राजेश हिवरे, ललिता भोळे (औरंगाबाद), विजय कोळी, माजी नगरसेवक दीपक धांडे, संध्या गोस्वामी, नरेंद्र महाले, मयूर महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सरफराज तडवी यांनी सर्व उपस्थित शिक्षकांचा सत्कार केला व महाविद्यालयातील क्रीडा विभागातील विद्यापीठस्तर खेळाडूना ट्रॅकसूट देणार असल्याचे आश्वासन दिले.
जीवनातील प्रगतीत महाविद्यालयाचे योगदान मोठे
प्रमुख वक्ते टेकचंद सोनवणे म्हणाले, जीवनात झालेली वैयक्तिक प्रगती ही या महाविद्यालयाची अनमोल देणगी आहे. या मातीने रुजविले, शिकविले त्यामुळे देशाच्या पार्लमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे प्रसिद्ध पत्रकार बनलो. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारीता करण्याचे भाग्य प्राप्त झाले असून जमिनीतून आलोय, असे सांगत त्यांनी जुने अनुभव कथन केले व भविष्यात महाविद्यालयातील विद्यार्थी यांना काही गरज भासल्यास मदत करेल, असेही ते म्हणाले.
महाविद्यालयाची भूमिका महत्वाची : प्राचार्य
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी महाविद्यालयाचा लेखा जोगा मांडताना महाविद्यालय काल आणि आज यात बरच मैलाचं अंतर असल्याचे सांगत कालच्या समस्या आणि आजच्या समस्या यातही खुप अंतर आहे, तरीही या परीस्थितीत महाविद्यायाने प्रचंड प्रगती केली असल्याचे सांगत आज महाविद्यालय आणि विद्यापीठ या दोहोंच्या विकासाच्या योगदानात आपल्या महाविद्यालयाची महत्वाची भूमिका बजावत आहे. या बरोबरच शिक्षण, व्यवस्थापन, संशोधन या क्षेत्रातही अग्रेसर असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेऊन कार्य करीत आहोत व करीत राहू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
यशस्वितेसाठी दीपक जैस्वार, डॉ.एस.डी.चौधरी, डॉ.आर.बी.ढाके, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, डॉ.जयश्री सरोदे, डॉ.भारती बेंडाळे, प्रा.अनिल सावळे, डॉ.जी.पी.वाघुळदे, डॉ.शोभा चौधरी, प्रकाश चौधरी, विजय पाटील, लिलाधर कुरकुरे, प्रकाश सावळे, दीपक महाजन यांनी परीश्रम घेतल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.एस.डी.चौधरी कळवतात. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील तर आभार डॉ.जगदीश चव्हाण यांनी मानले.


