चाळीसगावात वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परीवाराच्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप


चाळीसगाव : दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी वर्धमान धाडीवालांसारख्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी येथे व्यक्त केले. वर्धमान धाडीवाल यांच्या कार्याचा गौरव करीत दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देत अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेला 21 हजार रुपयांचा मदत निधी त्यांनी दिला. दिव्यांग दिनाचे औचित्य साधत वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परीवाराच्या वतीने दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अंधशाळा चाळीसगाव येथे झाला. याप्रसंगी निरीक्षक पाटील बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक के.के.पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, जनसेवक वर्धमान धाडीवाल,, मीनाक्षी निकम, सहाय्यक पोलिस निरीक्षक कापडणीस, समाज कल्याण विभागाचे अधिकारी चौधरी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव अरुण बापू निकम, दैनिक सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक सुरेश स्वार, रामचंद जाधव, दीपक पाटील, सोमसिंग राजपूत, डॉ.अनुप पवार, डॉ.हरीष दवे, योगेश भोकर, पवार गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.



दिव्यांग बांधवांना सहकार्य करणार : तहसीलदार
प्रथमतः सर्व मान्यवरांना वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर तहसीलदार अमोल मोरे यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधव तहसील कार्यालयात कामानिमित्त आले तर त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नंदकुमार वाळेकर यांनी पातोंडा येथील गायकवाड कुटुंबीयांची एका महिन्याच्या आत जी मदत केली त्याबद्दल मीनाक्षी निकम यांनी त्यांचे सहृदय आभार मानले व सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांग सुविधा केंद्र उभारून शासकीय योजनेचे सर्व लाभ देण्याचे आश्वस्त केले. किसनराव जोर्वेकर यांनी विविध शासकीय योजना लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अधिकार्‍यांना साद घालत लोकप्रतिनिधी यांनी पण दिव्यांग बांधवांसाठी पुढे आले पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली. अरुण बापू निकम यांनी देव देव्हार्‍यात नसून माणसात आहे आणि या युगात तो वर्धमान धाडीवाल यांच्या रूपाने दिसत असल्याचे गौरवोद्गार काढले. सोमसिंग आबा राजपूत यांनी 11000 व श्री.रमेश आबा चव्हाण यांनी 11 हजारांचा निधी स्वयं दीपपरीवाराला मदत स्वरूपात दिला. मीनाक्षी निकम यांच्या अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत वर्धमानधाडीवाल यांना दिव्यांग मित्र गौरव सन्मान-2021 पुरस्कार देऊन सहकुटुंब मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले तसेच समाज कल्याण विभाग जळगावच्या वतीने देखील वर्धमान धाडीवाल यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत गेल्या वर्षभरात दिव्यांग बांधवांना सहकार्य करणार्‍या तालुक्यातील 10 दिव्यांग मित्रांचा सन्मान करण्यात आला.

विविध साहित्याचे वाटप
यावेळी दिव्यांग बांधवांना 27 तीन चाकी सायकल, चार व्हील चेअर, 8 कुबड्या, 7 अंध काठ्या तसेच विधवा महिला यांना 9 शिलाई मशीनचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंदीप परीवार सदस्य, वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र मंडळाचे सदस्य यांनी अथक परीश्रम घेतले. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी तर आभार दिलीप घोरपडे यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !