यावलमधील साठवण तलाव भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाईसाठी भाजपाचे उपोषण
यावल : यावल नगरपरीषदेच्या माध्यमातून सुमारे एक कोटी 80 लाख रूपये निधीच्या खर्चातून नवीन साठवण तलावाची उभारणी करण्यात आली. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात जळगाव जिल्हाधिकार्यांनी चौकशी करून भष्ट्राचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी यावल तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वप्रथम यावल नगर परीषदेच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रारही केली होती.
कामात अनियमितता झाल्याचा आरोप
भाजपच्या या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून 30 दिवसाच्या आत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश काढले आहे. यावल नगरपरीषदेने साठवण तलाव कामाचे बिल व डिपॉझिट अदायगी केली असल्याचे कळाले असून या कामात अनियमितता करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला. चौकशी समितीने अद्याप यावल नगरपरीषदेला कोणतेही चौकशी कामी आदेश दिलेले नाहीत. भ्रष्टाचारात सहभागी असणार्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुकाअध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, भाजपाचे यावल शहराध्यक्ष निलेश गडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, भाजयुवा मोर्चाचे रीतेश बारी, शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश चौधरी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राऊल बार, शहर सरचिटणीस परेश नाईक, अॅड.गोविंद बारी, गोपाळसिंग पाटील, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे यांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.


