भुसावळातील ‘त्या’ कुटुंबियांनी दारीद्य्रापुढे टेकले हात अन् केले विष प्राशन
दाम्पत्यासह मुलीची प्रकृती अत्यवस्थ तर मुलाची प्रकृती धोक्याबाहेर : आत्महत्येपूर्वी कुटुंबियांनी लिहिली चिठ्ठी
भुसावळ : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यानंतर जगण्याचा संघर्ष सुरू असताना पत्नीचे आजारपण व मुलासह मुलीच्या भवितव्याची ग्रासलेली चिंता व सततची आर्थिक विवंचना या चक्रव्युहात गुरफटलेल्या कुटुंबाने सामूहिकरीत्या आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. एकाचवेळी कुटुंबातील चौघांनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले मात्र 24 तास उलटूनही कुटुंबातील सदस्य बाहेर येत नसल्याने रहिवाशांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी तातडीने धाव घेत दरवाजा तोडल्यानंतर विष प्राशन केलेल्या चौघांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. ही धक्कादायक घटना शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगरामागील गोकुळधाम रेसीडेन्सीत शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. दरम्यान, दाम्पत्यासह मुलीची प्रकृती अत्यवस्थ असून मुलाची प्रकृती मात्र धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दारीद्य्रापुढे टेकले हात अन् टोकाचा घेतला निर्णय
शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगरामागील गोकुळधाम रेसीडेन्सीत रीक्षा चालक विलास प्रदीप भोळे (60) हे पत्नी, मुलगा व घटस्फोटीत मुलीसह राहतात. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय चालेनासा झाल्याने भोळे घरीच थांबून होते. त्यातच पत्नीला बीपी, शुगर आदी आजारांनी ग्रासल्याने उपचाराचा खर्च वाढला होता शिवाय बेरोजगार असलेला मुलगा व मुलीचा दोन वेळा विवाह झाल्यानंतरही घटस्फोट झाल्याने कुटुंबात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. उत्पन्नाचे साधन नसल्याने प्रपंच चालवणे अवघड ठरून बसल्याने या कुटुंबाने सामूहिकरीत्या गुरुवारी सायंकाळी उदीर मारण्याचे औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत कुटुंबियांना उपचारार्थ दाखल केल्याने चौघांचे प्राण बचावले आहेत मात्र त्यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
रहिवाशांच्या सतर्कतेमुळे बचावले कुटुंब
रीक्षा चालक असलेल्या भोळे कुटूंबातील सदस्य गेल्या महिनाभरापासून कुणाशीही बोलत नव्हते तर गेल्या दोन दिवसात या कुटुंबातील सदस्य बाहेरदेखील आले नसल्याने स्थानिक रहिवाशांना संशय बळावला व त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. शुक्रवार, 10 रात्री पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ तसेच कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबाकडे असलेल्या मोबाईलवर आधी संपर्क साधण्यात आला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी अखेर दरवाजा तोडला असता कुटुंबातील चारही सदस्य विष प्राशन केलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून चौघांना शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवले.
तिघांची प्रकृती अत्यवस्थ
रीक्षा चालक विलास प्रदीप भोळे (60), त्यांच्या पत्नी लताबाई विलास भोळे (52), मुलगी प्रेरणा विलास भोळे (28), मुलगा चेतन विलास भोळे (27, सर्व रा.वांजोळा रोड, प्रेरणा नगर) यांच्यावर डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे उपचार सुरू आहेत. मुलगा चेतनची प्रकृती धोक्याबाहेर असून अन्य तिघांची प्रकृती मात्र अत्यवस्थ असल्याचे डॉ.मानवतकर म्हणाले.
अठराविश्व दारीद्य्रामुळे आत्महत्येचा सामूहिक निर्णय
पोलिसांनी भोळे यांच्या घरातून लताबाई भोळे (52) यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट जप्त केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पती-पत्नीकडील नातेवाईकांनी पाठ फिरवली शिवाय बेरोजगार असलेला मुलगा व घटस्फोटीत मुलीच्या आयुष्याची चिंता व त्यातच अठराविश्व दारीद्य्रामुळे अन्नाचा कणही मिळणे कठीण झाल्याने या विवंचनेतून सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले असल्याचे समजते. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.


