भुसावळातील जळगाव रोडसह आरपीडी रस्त्यावर अतिक्रमण हटणार !

पालिकेने दिला 24 तासांचा अल्टीमेटम : मंगळवारी अतिक्रमण न निघाल्यास बुधवार पालिका करणार कारवाई


भुसावळ : शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण व राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, 17 रोजी भुसावळ शहराच्या दौर्‍यावर येत असल्याने या अनुषंगाने तयारीला वेग देण्यात आला आहे. जळगाव येथून बाय रोड अजितदादा पवार शहरात येत असल्याने जळगाव रस्त्यासह आरपीडी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येणार असून सोमवारी पालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांना 24 तासात अतिक्रमण हटवण्याच्या सूचना नोटीसीद्वारे दिल्या आहेत. त्यानंतरही अतिक्रमण न निघाल्यास बुधवारी हे अतिक्रमण प्रशासन काढेल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली.

अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण हटणार
यापूर्वी रविवार, 5 रोजी उपमुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित होता मात्र वातावरणातील बदलाने हा दौरा रद्द झाल्यानंतर आता शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी दौरा निश्चित करण्यात आला आहे. शहरातील जुना सातारा भागासह डी.एस.ग्राऊंडवर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकासकामांचे लोकार्पण व पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.



प्रवेश सोहळ्यासह विकासकामांचे लोकार्पण
भुसावळ दौर्‍यावर येत असलेल्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणावर अनेक दिग्गजांचा प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 17 रोजी दुपारी एक वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण तसेच नगरपरीषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन होईल तसेच दुपारी 1.30 वाजता आरपीडी रस्त्यावर डी.एस.ग्राऊंडवर (डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर पटांगण) राष्ट्रवादी जिल्हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

मैदानाचे सपाटीकरण
शहरातील डी.एस.ग्राऊंडवरील पटांगणावर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मैदानाच्या सपाटीकरणाला वेग दिला आहे. सोमवारी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, पुरूषोेत्तम नेवे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, सुमित बर्‍हाटे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मैदानाची पाहणी केली. याप्रसंगी मैदान स्वच्छतेसह सपाटीकरणाच्या सूचना देण्यात आल्या.

24 तासात अतिक्रमण हटवण्याचा अल्टीमेटम
आरपीडी रोडसह जळगाव रोडवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात यापूर्वीच पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या मात्र 5 डिसेंबरचा दौरा रद्द झाल्यानंतर अतिक्रमण कायम राहिले मात्र सोमवारी पुन्हा या व्यावसायीकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून 24 तासात अतिक्रमण न हटवल्यास बुधवारपासून पालिका हे अतिक्रमण हटवणार असल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.

  • भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !