कल्याणमधील सेवानिवृत्त मोटरमनची हत्या मुलानेच केल्याचे उघड


कल्याण : सेवानिवृत्त मोटरमन प्रमोद बनोरीया यांची हत्या मुलानेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून आरोपी मुलाने हत्येचा बनाव केल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिमेकडील चिकणघर परीसरातील निखिल हाईटस या हाय प्रोफाइल सोसायटीत रविवारी बनोरीयाचा यांचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. वडीलांची हत्या करून त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव मुलगा लोकेशने रचल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे शुक्रवारी रात्री घडलेली ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. वडीलांची हत्या करून तो 24 तास मृतदेहासमोर बसला होता.

वॉचमनमुळे घटना उघडकीस
बनोरीया कुटुंबाचे निखील हाईटस सोसायटीत चौथ्या मजल्यावर वास्तव्याला होते. रविवारी सकाळी लोकेशने सोसायटीच्या वॉचमनला फोन करून रूग्णवाहीका हवी असल्याचे सांगितले. संशय आल्याने वॉचमनने ही बाब सोसायटीतील अन्य रहिवाशांना सांगितली. त्यांनी बनोरीया यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना एकच धकका बसला. कौटुंबिक वादातून वडीलांनी आमच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वत:वर चाकूने वार करून आपले जीवन संपविले, अशी माहिती जखमी अवस्थेतील लोकेशने पोलिसांना दिली होती. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात लोकेशनेच वडीलांची हत्या केल्याचे समोर आले. वडीलांच्या शरीरावर 4 ते 5 वेळा चाकुने वार करून त्यांची हत्या केली तर आईवर ही वार करून तीला गंभीर जखमी केले आणि स्वत:च्या गळयाच्या ठिकाणी जखम करून घेतल्याची कबुली लोकेशने दिल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक उमेश माने-पाटील यांनी दिली. सध्या जखमी लोकेशसह आई कुसुमवर शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकेश विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

दोघेही एकत्र दारू प्यायचे
बनोरीया पिता-पूत्र नेहमी एकत्र दारू प्यायचे. तेव्हा त्यांच्यात वाद व्हायचे. शुक्रवारी देखील त्यांच्यात दारू पिताना मोठा वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली. लोकेश हा बी.कॉमचे शिक्षण घेत होता परंतु तो व्यसनाच्या आहारी गेला होता, अशीही माहिती मिळत आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त मोटरमन होते तर आई गृहिणी होती. ती मानसिक आजारी असल्याचीही माहिती समोर आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !