मोठी बातमी : मुलीच्या लग्नाचे वय आता 21 वर्ष : केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी
मुंबई : सध्या 18 व्या वर्षीच मुलीचे लग्न करता येत असलेतरी आता मात्र वयाची मर्यादा 21 वर्ष करण्याचा विचार सुरू असून हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचे समजते. गतवर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून या विषयीचे संकेत दिले होते.
बालविवाह कायद्यात सुधारणा
मुलींचे लग्नाचे किमान वय लवकरच 18 वरून 21 वर्षे केले जाऊ शकतं. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. या संबंधीचे विधेयक संसदेच्या या अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या या कायद्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 ठेवण्यात आली आहे.


दुरुस्ती विधेयकाला मंजुरी
बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत कायद्यात बदल करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री मंडळ बैठक झाली. या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी दिल्या होत्या.
