शीना बोरा जिवंत : हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या दाव्याने उडवली खळबळ
मुंबई : देशभर चर्चेत राहिलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आई इंद्राणी मुखर्जीने केलेल्या अजब दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शीना बोरा अद्याप जिवंत असून ती काश्मिरात असल्याचे एका महिलेने पाहिल्याचा त्यांनी केला आहे. या संदर्भात भायखळा कारागृहात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला पत्र लिहित याबाबत तपासाची मागणी केली आहे.
सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता
इंद्राणीने विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात 2015 पासून शीनाची आई आणि मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी भायखळा जेलमध्ये आहे. गेल्याच महिन्यात मुंबई हायकोर्टानं इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर इंद्राणी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे.

मुलीच्या हत्येचा आरोप
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला सन 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आल्याचा आरेाप आहे. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीने वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरू असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.
