वरणगावात भाजपानेच करवाढीला दिली मान्यता ; आता चमकोगिरी आंदोलनातून फसवणूक

शिवसेनेच्या आरोपाने राजकारणात उडाली खळबळ : वरणगाव नगरपरीषदेने लागू केलेली करवाढ त्वरीत रद्द करण्याची शिवसेनेची मागणी


वरणगाव : वरणगाव नगरपरीषद प्रशासनाने वरणगाव शहरवासीयांवर केलेली जुलमी करवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गुरुवारी सकाळी 10 वाजता नगरपरीषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्याकडे शिवसेनेतर्फे निवेदन देऊन करण्यात आली.

ही तर भाजपाची चमकोगिरी
निवेदनाचा आशय असा की, नगरपरीषद प्रशासनाने शिक्षण कर, वृक्ष कर, घनकचरा कर, रोजगार हमी कर हे लावलेले अवाजवी जुलमी करवाढ रद्द करावी शिवाय 24 जुलै 2015 वर्षी तत्कालीन भाजप पक्षाची सत्ता नगरपरीषदेवर असताना ठराव क्रमांक आठनुसार सर्वसाधारण सभेत सभागृहात ठराव मंजूर करून भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी करवाढीला मान्यता दिली मात्र आता भाजप पक्षाचे करवाढीच्या विरोधात चमकोगिरी आंदोलन करून वरणगावकरांची फसवणूक करीत आहे. नौटंकी आंदोलन करून वरणगावकरांना देखावा दाखविण्याचा प्रयत्न भाजपचे माजी नगराध्यक्ष व पदाधिकारी करीत आहे. या नौटंकी आंदोलनाचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात येत असल्याचेही दिलेल्या निवेदनात नमूद आहे.



यांची होती उपस्थिती
निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख सुनील भोई, विभागप्रमुख संजू कोळी, सुरेश चौधरी, मुस्लिम समाजाचे सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, संतोष माळी, सुखदेव धनगर, राम शेटे, रोहित मुळे, मितेश पाचपोळ, अबू सुफियान, अबूबकर खान, सय्यद मुजाहीद, प्रल्हाद माळी, ताज शेख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, निवेदनच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठविण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !