भुसावळातील रेल्वे विस्थापीतांना घरकुल देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भुसावळातील कार्यक्रमात ग्वाही : पालिका ईमारतीसाठी पाच कोटींच्या निधीची घोषणा
भुसावळ : भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर नागरीकांचे पुर्नवसन करणे गरजेचे असताना त्यांना वार्यावर सोडण्यात आले मात्र विस्थापीतांना त्यांच्या हक्काचे घरकुल बांधून दिले जाईल, हे निवडणुकीतील आश्वासन नसून अजितदादांनी दिलेला शब्द आहे व दिलेला शब्द खरा करणे हीच माझी ओळख असून त्यासाठी भले मोठी किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, अशी ग्वाही भुसावळातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शुक्रवार, 17 रोजी दुपारी चार वाजता आरपीडी रोडवरील डी.एस.ग्राऊंडवर कार्यकर्ता मेळावा झाला. याप्रसंगी भुसावळातील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार यांनी पक्षाचा गमचा टाकून त्यांचे प्रसंगी स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे एकत्रीत स्वागत करण्यात आले तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कचार करण्यात आला.
भुसावळातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावणार
अजितदादा पवार म्हणाले की, रेल्वेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून राहणार्या नागरीकांना विकासाच्या नावाखाली जाग सोडण्यास भाग पाडण्यात आले मात्र त्यांचे पुर्नवसन करणे गरजेचे असताना त्यांना वार्यावर सोडण्यात आले. कुठल्याही शहरात विमानतळ, धरणे वा जागा अधिग्रहण करताना अतिक्रमण हटवावे लागते मात्र संबंधितांचे पुर्नवसन देखील करणे गरजेचे आहे. भुसावळातील रेल्वे हद्दीतून विस्थापीत झालेल्या नागरीकांना निश्चित त्यांच्या हक्काचे घरकुल दिले जाईल, पालिकेने त्या संदर्भात सुधारीत प्रस्ताव पाठवावा, मुंबईत त्याबाबत बैठक लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ.सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी
) खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन, चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख, पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँक माजी अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, एजाज मलिक, जि.प.चे माजी सदस्य संजय गरूड (शेंदुर्णी), भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, अनिकेत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मानले.
