सोन्यासारखे नेतृत्व असलेल्या नाथाभाऊंची किंमत भाजपाला कळालीच नाही : अजित पवार
भुसावळ : जळगावचे सोने अस्सल बावनकशी असून जळगाव जिल्हा शुध्द सोन्यासाठी प्रसिध्द आहे व याच जिल्ह्यात ज्येष्ठ नेते असलेल्या नाथाभाऊ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची नेतृत्वाची किंमत भाजपासारख्या पक्षाला अखेरपर्यंत कळालीच नाही मात्र ती राष्ट्रवादी काँग्रेसला कळाली आणि नाथाभाऊंना पक्षात प्रवेश देण्यात आला अर्थात आमच्या विनंतीला मान देवून नाथाभाऊ पक्षात आले, अशी प्रांजल कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. शुक्रवार, 17 रोजी दुपारी चार वाजता शहरातील आरपीडी रोडवरील डी.एस.ग्राऊंडवर कार्यकर्ता मेळावा झाला. याप्रसंगी पवार बोलत होते.
सुसंस्कृत राज्यात यापूर्वी असे कधीही घडले नाही
भाजपाने खडसे यांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला. त्यांच्या खोट्या नाट्या चौकशा लावल्या. या अगोदर या सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीच असे घडले नाही मात्र भाजपा पक्षाने ते घडविले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला, त्या वेळी हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे राज्य असावे, सुसंस्कृत राज्य असावे असा त्यांचा विचार होता, आणि आजपर्यंत त्याच विचाराने राज्य सुरू होते मात्र आता विरोधकांच्या चौकशा लावल्या जात आहेत, जाणून-बुजून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी करीत केंद्रातील भाजपा सरकारवर अप्रत्यक्ष टिका केली.


लक्षात ठेवा : चार दिवस सुनेचेही येतील
केंद्रावर टिका करताना अजितदादा म्हणाले की, कुणीही ताम्रपट घेवून जन्माला आलेले नाही, चार दिवस सासुचे असतात तर चार दिवस सुनेचेही नक्कीच येतात त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जनता जर्नादन भल्या-भल्यांना ठिकाणावर आणते याचे उदाहरण देशाने पाहिले आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने मताचा अधिकार दिला आहे. जर ही जनता खवळली तर ज्या प्रमाणे तुम्हाला डोक्यावर घेते त्या प्रमाणे मतांच्या अधिकारावर तुम्हाला बाजूला करू शकते हे लक्षात असू द्यावे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
तर जिल्ह्यात चित्र वेगळे असते !
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर भाजपात असताना खोटे-नाटे आरोप लावण्यात आले, त्यांच्या चौकशा करण्यात आल्या. वैभवशाली महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीही घडले नाही. राज्य सुसंस्कृत कसे असावे? हा विचार स्व.यशवंतराव चव्हाण यांनी रूजवला होता. तेव्हापासून आतापर्यंत विरोधकांना त्रास दिला जात नव्हता मात्र आता परीस्थिती वेगळी आहे. माजी मंत्री खडसे आमच्या शब्दाला मान देवून राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाची जिल्ह्यात मोठी ताकद वाढली आहे. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार होते मात्र मागील वेळी एकच आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी बॅक फुटवर गेली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाथाभाऊ पक्षात आले असते तर चित्र कदाचित वेगळे असते! असेही ते म्हणाले. पक्षात आता जुना व नवा वाद होता कामा नये, एकसंघ होवून सर्वांनी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवीन लोकांना संधी देण्याचा पक्षात निश्चित प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
