उद्धव ठाकरे साहेब दखल घ्या : अनिल परबांकडून शिवसेना संपवण्याचा घाट !

रामदास कदमांच्या लेटर बॉम्बने उडवली खळबळ ः परब तर गद्दारच !


मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढार्‍यांना सोबत घेऊन शिवसेना आणि रामदास कदमला संपविण्याचा घाट परीवहन नेते अनिल परब यांनी घातल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रामदास कदमांनी केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमकं कोण आहेत? उद्धव ठाकरे की अनिल परब?, असा सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली असून परब कोकणात शिवसेनेचं अस्तित्त्व संपवण्याचं काम करत असून ते खरे गद्दार आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

आपल्यामध्ये व सोमय्यांमध्ये कधीही चर्चा नाहीच
रामदास कदम आणि किरीट सोमय्या यांच्यात चर्चा झाली असून अनिल परबांविरोधात कटकारस्थान रचलं जात असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याच्या मुद्यावरदेखील कदम यांनी स्पष्टीकरण दिलं. मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की माझं कधीच किरीट सोमय्या यांच्याशी चर्चा झालेली नाही. अनिल परब यांचं हॉटेल ही काही शिवसेनेची मालमत्ता नाही. मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बांधकाम स्वत: तोडलं. मग अनिल परबांची अनधिकृत मालमत्ता काय शिवसेनेची मालमत्ता आहे का? त्याविरोधात बोललं तर काय चुकीचं केलं? , असं रामदास कदम म्हणाले.



उद्धवजी कृपा करून त्यांना थांबवा
उद्धवजी पुन्हा आपल्याला हात सोडून सांगतो की, आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्रिपद दिले. ते कुणाची घरे फोडणे, शिवसेना नेत्याला इतर पक्षांच्या पुढार्‍यांना हाताशी धरून संपवणे अशी कामे करत आहेत. कृपा करून त्यांना थांबायला सांगावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, सूर्यकांत दळवी माझ्यावर वारेमाप टीका करतो. ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत व जिल्हा परिषद निवडणुका, विधासनभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये त्याने उघडपणे शिवसेनेच्या विरोधात काम केले आहे, अशी तक्रारही त्यांनी केली आहे. जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढार्‍यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती करून भेटी अंती सविस्तर बोलू, असेही म्हटले आहे.

नव्या चेहर्‍यांना संधी का दिली नाही?
मंत्रिपदांबाबत मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी शिवसेना भवनात बोललो होतो. मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आता ज्येष्ठ झालो आहोत. त्यामुळे आम्हाला मंत्रिपदं न देता नव्या चेहर्‍यांना संधी द्यावी असं मी स्वत: उद्धवजींना सांगितलं होतं. मला मंत्रिपद मिळालं नाही याचं अजिबात दु:ख नाही. पण यादीत पहिलं नाव सुभाष देसाईंचं होतं. नव्या चेहर्‍यांना संधी का मिळाली नाही असा प्रश्न मला पडला, असं रामदास कदम म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !