प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या घरात केली चोरी
नाशिक रोड : जेलरोड, बेला डिसूजा रोड येथे पत्नीने दुसर्या पत्नीचा भाऊ व प्रियकराच्या मदतीने पतीच्या घराचे कुलूप दगडाने तोडून सुमारे सव्वासहा लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उपनगर पोलिसात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेला डिसूजारोड येथील अरुण सटवाजी साखरे यांनी फिर्याद दिली आहे. ते बुधवारी दुसरी पत्नी, मुलगा, मुलगी असे तपोवन एक्सप्रेसने मूळगावी जालन्यातील टेंभुर्णी येथे गेले होते. त्यांनी टेंभुर्णी येथे गेल्यानंतर पत्नीच्या आई-वडिलांना तिच्या प्रेमसंबंधाबाबतचे रेकॉर्डिंग ऐकवत पहिल्या पत्नीचा प्रियकर नंदकुमार रायझाडे याच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबतची माहिती तिचे आई-वडील व भाऊ यांना दिली. दरम्यानच्या काळात पहिली पत्नी, तिचा भाऊ व प्रियकर यांनी घराचे कुलूप दगडाने तोडून पाच लाख 50 हजारांची रोकड, 70 हजारांचे मंगळसूत्र, तीन मोबाईल, चार साड्या असा सहा लाख 28 हजारांचा ऐवज चोरून नेला. घर दुरुस्त करण्यासाठी बँकेतून चार लाख रुपये काढून घरात ठेवल्याची माहिती पत्नी नंदा, तिचा भाऊ सचिन साळवे व प्रियकर रायझाडे यांना होती. त्याचा फायदा घेत त्यांनी चोरी केल्याचा आरोप साखरे यांनी केला आहे. साखरे शुक्रवारी काम आटोपून नाशिकला पोहोचले तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व लोखंडी कपाट उघडे दिसले. त्यानंतर त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा करण्यात आला आहे.

