रस्त्यांची तुलना हेमा मालिनीच्या गालांशी : पालकमंत्री गुलाबरावांच्या वक्तव्यावर उठली टिकेची झोड
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांसह रुपाली पाटील यांची गुलाबरावांच्या वक्तव्यावर टिका
जळगाव/मुंबई : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे होत असलेल्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना डिवचताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी त्यांनी केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुलाबरावांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत कारवाईचा इशारा दिलाय.
जाहीर माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जावे
गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटलांना इशारा दिला आहे. गुलाबरावांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे तर खडसे यांनीही पाटील यांना उत्तर देताना काम केलं म्हणून जनतेने आपल्याला निवडून दिलं, असा पलटवार केला. मात्र, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.


शिवसेना उमेदवाराच्या प्रचारावेळी पाटलांचं वक्तव्य
मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या ठिकाणी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकलेत. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी बोदवडमधील रस्त्यावरुन खडसे यांच्यावर टीका केली.
प्रवीण दरेकरांची कारवाईची मागणी
‘गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखर चुकीचे विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही ? हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल’, असं ट्वीट करत प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
करतातत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल. (2/2)#Gulabraopatil#MVAGovernment
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 19, 2021
