राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : माजी मंत्री गिरीश महाजन

गारखेडाजवळील अपघात एस.टी.संपामुळेच : सर्वसामान्यांचे जीव जात असताना शासन मात्र गप्पच


जामनेर : तालुक्यातील गारखेड्याजवळ झालेला भीषण अपघात हा एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे झाला असून राज्य सरकारची अनास्था यासाठी कारणीभूत ठरली आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे जीव जात असतांना शासन स्वस्थ बसलेले आहे. यामुळे राज्य सरकारवर या अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

गारखेडा अपघातात तीन प्रवाशांनी गमावला जीव
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावाजवळ लाकूड वाहून नेणार्‍या 407 वाहनाने अ‍ॅपे रीक्षाला उडविले. यात तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. या प्रकरणी एका निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.



संपामुळे झाला अपघात
आमदार गिरीश महाजन यांनी या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी गारखेडा येथे झालेला अपघात हा एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपामुळे झालेला आहे. हा संप गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या सर्वसामान्य नागरीकांना प्रवास करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यामुळे नागरीकांना नाईलाजास्तव खाजगी वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागत आहे. यातच आता खाजगी वाहने देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करत आहेत. यामुळे प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अनेक जणांना जीव गमवावा लागत आहे. जामनेर तालुक्यातील अपघातही याच प्रकारातील आहे. या अपघातासाठी राज्य सरकारची अनास्था कारणीभूत आहे. कारण सरकारने एस.टी. कर्मचार्‍यांचा संप संपुष्टात यावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जर सरकारने प्रयत्न केले असते तर संप मिटला असता आणि अर्थात आजचा अपघातदेखील झाला नसता. यामुळे आजच्या संपासाठी संपूर्णपणे राज्य सरकार हेच जबाबदार असून यामुळे सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गिरीश महाजन यांनी या निवेदनातून केली आहे. या अपघातात मृत झालेल्यांना राज्य सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणीदेखील आमदार महाजन यांनी या निवेदनात केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !