बोदवड नगरपंचायतीसाठी 73 टक्के मतदान
19 जानेवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार निकाल
बोदवड : बोदवड नगरपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मंगळवार, 21 रोजी किरकोळ अपवाद वगळता 73 टक्के शांततेत मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत काही केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कडाक्याची थंडी असल्याने सकाळच्या वेळी मतदान केंद्रांवर गर्दी नसलीतरी दुपारनंतर मात्र मतदार बाहेर निघाले. अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, 19 जानेवारी रोजी मतमोजणी अंती निकाल हाती येणार आहेत तर ओबीसी प्रवर्गातील चार जागांसाठी 18 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे.
53 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
13 प्रभागातील 53 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 13 प्रभागांसाठी 15 हजार 468 मतदारांपैकी 11 हजार 213 मतदारांनी (72.50) टक्के मतदान झाले.


जिल्हाधिकार्यांनी दिली भेट
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी शहराला भेट देत निवडणुकीचा आढावा घेतला. दरम्यान, प्रभाग क्रमांक 11 मधील मतदान केंद्रावर सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. या मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तासह कमांडो तैनात करण्यात आले. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील दिवसभर बोदवडमध्ये तळ ठोकून होते. बोदवडमधील मतदान केंद्रावर त्यांनी पाहणी केली.
