‘धर्म से धम्म तक’: आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक दस्ताऐवज : प्रा.डॉ.सुरेश तायडे


मुक्ताईनगर : ‘धर्म से धम्म तक’ ही कादंबरी आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक दस्ताऐवज असल्याचे प्रतिपादन एम.जे.कॉलेजचे निवृत्त उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे यांनी केले. कवी, लेखक संघटन मुक्ताईनगरच्या वतीने आयोजित पंचायत समिती सभागृहात ते बोलत होते. प्रसंगी कादंबरीचे प्रकाशन समाज भूषण प्रतापसिंग बोदडे यांच्याहस्ते करण्यात आले.

गावगाड्याचं यथार्थ दर्शन कादंबरीत
समाजभुषण प्रतापसिंग बोदडे म्हणाले की, डॉ.अ.फ.भालेराव यांच्या कादंबरीतील नायिका रूपाबोय क्रांतीची भाषा बोलते. घाटा, घूगर्‍या खा पण स्वाभिमान विकू नका, अशी कणखर निडर नायिका या कादंबरीत आहे.गावगाड्याचं यथार्थ दर्शन कादंबरीत आहे. यावेळी कादंबरीचे मुळ लेखक डॉ.अ.फ.भालेराव म्हणाले की, कादंबरीमध्ये आंबेडकरी समाजाच्या तीन पिढ्यांचा लेखा-जोखा अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. पहिल्या पिढीत उपेक्षीतांचे जग आहे. दुसरी पिढी आंबेडकरकालीन असून आंबेडकररुपी क्रांती सूर्याच्या ज्ञान प्रकाशाने उजळून निघालेली आणि माणूस म्हणून मानवतेच्या अत्त दीप भवच्या वाटेनं परीक्रमण करणारी आहे. डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर सूर्यास्ताच्या काजळल्या दिशेत स्वत:च्या स्वार्थी परिघात अडकलेली दिसते. मुख्य अतिथी पोलिस निरीक्षक राहुल खताळ म्हणाले की, समाज प्रबोधनासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. जे गरीब दीन-दलित आहेत त्यांना मदत केली पाहिजे. सूत्रसंचालन प्रा.डॉ.किरण चव्हाण यांनी तर प्रास्ताविक प्रवीण सरदार यांनी तसेच आभार मोहन मेढे यांनी मानले..




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !