लाच भोवली : मंडळाधिकारी तलाठी एसीबीच्या जाळ्यात
वसई : सात बारा व फेरफार नोंद प्रक्रियेसाठी 45 हजारांची लाच स्वीकारताना वसई तालुक्यातील महसूल विभागात कार्यरत वसई मंडळ अधिकारी व त्यांचे ससूनवघर गावचे तलाठी या दोघांना त्यांच्या खाजगी इसमासाहित ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार, 21 डिसेंबरच्या सायंकाळी उशिरा लाच स्वीकारताच अटक केली. मंडळाधिकारी शशिकांत मधुकर पडवळे (51), तलाठी विलास धर्मा करे-पाटील (39) व खाजगी पंटर प्रवीण छबुलाल माळी (43) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
एक लाख 20 हजारांची मागणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससुनवघर गावात राहणार्या 23 वर्षीय पीडित तक्रारदार तरुणाने आपल्या नावे सात बारा व फेरफार नोंद प्रक्रियेसाठी ससूनवघर तलाठी कार्यालयात अर्ज केला होता तर या कामांसाठी त्याच्याजवळ सुरुवातीला 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती तर पुढे तडजोड करत 70 हजार देण्यास सांगितले आणि अखेर मंगळवारी तडजोडी अंती आरोपी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांस 20 हजार रुपये व तलाठी करे पाटील याने 25 हजार रुपये असे दोघांनी मिळुन 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली.

