बोलेरो जीप व काळीपिवळी धडकली : तिघे जागीच ठार
लातूर : बोलेरो जीप व काळीपिवळीत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास औसा-लामजना मार्गावरील वाघोली पाटीजवळ घडला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती.
भरधाव वाहने धडकली
प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी (एम.एच. २४ ए .फ. ०९५९) ही औशाहून लामजन्याकडे प्रवासी घेऊन जात असताना लामजन्याहून औशाकडे भरधाव येणारी बोलेरो (एम.एच.३० ए.ए. ४८०९) ची वाघोली पाटीजवळ समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यात काळीपिवळी जीपचा चक्काचूर झाला तर बोलेरो १५० फुट लांब जावून खड्ड्यात पडली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एकाचा लातूर येथे उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृतांची पटली नाही ओळख
अपघातातील मृतांचे नातलग सोबत नसल्याने उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही. अपघातातील इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी आहेत. सर्वांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी औसा पोलिसांनी पाहणी करून वाहतूक सुरळीत केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनीही घटना स्थळाला भेट दिली.
दरवाजे तोडून बाहेर काढले प्रवासी
अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. जखमीसह मृतांनाही जीपचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधील मयत असल्याने नेमकी कोण कोठून बसले, कोणत्या गावातील होते याची माहिती पोलिसांनाही नव्हती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे कळली नसल्याचे औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी सांगितले.
