चारचाकी समोरा-समोर धडकून भीषण अपघात : दाम्पत्यासह तिघे जागीच ठार
विटा : दोन चारचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघेजण ठार झाले. कपिल माणिक झांबरे व त्यांची पत्नी धनश्री कपिल झांबरे (रा. डोंगरसोनी, ता. तासगाव) व सुदर्शन गजानन निकम (रा. विटा) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. हा अपघात नेवरी (ता. कडेगाव) येथे शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचुर झाला. विट्याहुन पुसेसावळीकडे जाणार्या व तिकडून विट्याकडे येणार्या दोन कारची समोरा-समोर धडक झाली.
अपघातात कारचा चक्काचूर
डोंगरसोनी येथील कपिल झांबरे व त्यांची पत्नी धनश्री आणि प्रज्वल कुंडलिक झांबरे असे तिघेजण त्यांच्या कारने पुण्याहुन तासगावकडे निघाले होते तर विटा येथील सुदर्शन गजानन निकम व संग्राम संजय गायकवाड हे दोघे जण खेराडे येथून विट्याकडे येत होते. त्यावेळी नेवरी गावाजवळ या दोन कारची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटारीतील कपिल व त्यांची पत्नी धनश्री झांबरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्या मोटारीतील सुदर्शन निकम हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कराड येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात डोंगरसोनी येथील प्रज्वल झांबरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. तर संग्राम गायकवाड हे किरकोळ जखमी झाले.

पोलिसांची अपघातानंतर धाव
अपघाताची माहिती मिळताच विटा व कडेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील पती- पत्नीचे मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात दुर्दैवी अंत झालेले कपिल व त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे या उच्चशिक्षित आहेत. कपिल हे अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी नुकतीच इस्रोची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांना यश मिळाल्याने त्यांची निवड दिल्ली येथे इस्रोमध्ये झाली होती तर त्यांच्या पत्नी धनश्री या अभियंता आहेत. या अपघातात ठार झालेले विटा येथील सुदर्शन निकम हे कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचे चिरंजीव आहेत. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
