भुसावळातील खून प्रकरण : आधी पतीला दिला धक्का नंतर आवळला गळा

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अभ्यासू निरीक्षणानंतर उघडकीस आला खुनाचा गुन्हा भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरातील घटना : पतीने गळफास घेतल्याचा करण्यात आला होता बनाव


भुसावळ : व्यसनी पतीकडून सतत होणारी मारहाण व शिविगाळ यास कंटाळून शहरातील 46 वर्षीय विवाहितेने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना भुसावळातील लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे घडली. या घटनेत गणेश प्रभाकर महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयीत आरोपी पत्नी सीमा गणेश महाजन (46, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. विशेष बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी हा गुन्हा घडला असलातरी अकस्मात मृत्यूचा अंतिम अहवाल पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांना शंका आली व डॉक्टरांचा स्वयंस्पष्ट अहवाल घेण्याचे त्यांनी सूचित केले. हा अहवाल खुनाची उकल करण्यात महत्वाचा दुवा ठरला.

पत्नी म्हणाली ; मीच आज खेळ संपवते
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, भाजीपाला व्यावसायीक गणेश महाजन हे नेहमीच पत्नीला दारू पिवून मारहाण करीत असल्याने नेहमीच या कुटूंबात भांडण होत होते. घटनेच्या दिवशी 4 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी चार वाजता गणेश महाजन हे पुन्हा दारू पिवून आल्यानंतर दाम्पत्यामध्ये भांडण झाले. पतीने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र ते न दिल्यानंतर पतीने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर ते जिन्यावर चढत असताना जमिनीवर पडले व त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर गणेश महाजन यांनी नायलॉन दोरी घेत पत्नी सीमा यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला मात्र रोजच्या प्रकाराला कंटाळलेल्या सीमा यांनी मीच आज तुमचा खेळ संपवते म्हणत संतापात दोरी हिसकावून पतीला जोरदार धक्का दिल्याने ते खाली कोसळले व त्यानंतर पतीच्या गळ्याभोवती त्यांनी नॉयलॉन दोरीचा घट्ट फास आवळताच काही क्षणात पती जागेवरच गतप्राण झाले. यानंतर पतीला त्यांनी मागच्या रूममध्ये आणून टाकले. सायंकाळी सात वाजता मुलगा मयूर घरी आल्यानंतर पित्याने गळफास घेतल्याचे दिसताच त्याने आरडा-ओरड केली. यावेळी पत्नीनेदेखील आपल्याला त्यातले काहीच माहित नाही, असा आर्विभाव आणला. पोलिसात या प्रकरणी सुरूवातीला मयूर महाजन यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र नंतर खुनाचा गुन्हा उघड झाला.



शंकेची पाल चुकचुकली अन उघड झाला खून
गणेश महाजन यांचा 4 ऑगस्ट 2020 मृत्यू झाल्यानंतर मयताची पत्नी सीमा, आई नर्मदाबाई व मुलगा मयूर यांचे पोलिस निरीक्षकांसमक्ष जवाब नोंदवण्यात आले. त्यात त्यांनी कुणावरही शंका व्यक्त न करता महाजन यांनीच स्वतः गळा आवळल्याचा जवाब दिल्यानंतर पोलिसांनाही शंका आली नाही मात्र यानंतर तपासाधिकारी असलेले हवालदार यजेंद्र पगारे यांनी अंतिम अहवाल पोलिस उपअधीक्षकांकडे 16 मार्च रोजी मंजुरीसाठी पाठवला असता पोलिस उपअधीक्षकांना पीएम नोटबाबत शंका आली व त्यानंतर डॉक्टरांना या प्रकरणात स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे सूचित करण्यात आले. मयताला झालेली दुखापतः स्वतःहून करणे शक्य नाही तसेच मयत अन्य घाताने मयत झाल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने पोलिस उपअधीक्षकांनी विश्वासाने मयताच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केला.

पोलिस स्वतःच झाले फिर्यादी
या प्रकरणात मयताच्या कुटुंबातील कुणीही सीमा महाजन यांच्याविरोधात तक्रार द्यायला तयार नसल्याने पोलिस नाईक संदेश निकम यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून सीमा महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली.

पोलिस उपअधीक्षकांनी वर्षभरातच केली दोन खुनाच्या गुन्ह्यांची उकल
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्षभरात दोन खुनांची यशस्वीपणे उकल केली आहे. रावेर तालुक्यातील सुनोदा येथील रहिवासी असलेल्या दीपक भगवान सपकाळे (24) या तरुणाचा घराशेजारील विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधानानंतर खून करण्यात आला होता. आरोपींनी मृतदेह नशिराबाद रेल्वे रूळावर फेकला मात्र ज्या पद्धत्तीने तरुणाचा मृतदेह घटनास्थळी आढळला ती पद्धत पाहून हा खूनच असल्याचा निष्कर्ष वाघचौरे यांनी त्याचवेळी काढला. मयताच्या मोबाईलवर आलेला अखेरचा कॉल, मयताची घटनास्थळी आढळलेली दुचाकी व तांत्रिक विश्लेषणानंतर हा खून डिसेंबर 2020 मध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे (24, सुनोदा) व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी/तायडे (21, रा.पाडळसा) व अन्य एका विधी संघर्ष बालकाविरोधात नशिराबाद खुनाचा गुन्हा दाखल करून संशयीतांना अटक करण्यात आली होती तर भुसावळातील गणेश महाजन यांच्या खुनाची उकल करण्यातही वाघचौरे यांना यश आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !