खासदार रक्षा खडसेंनी केला हल्ल्याचा निषेध : दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी
मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक अॅड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खासदार रक्षा खडसे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुक्ताईनगरातील गुन्हेगारी संदर्भात आपण आयजी व पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करावी व हल्लेखोरांच्या पाठीमागे असलेल्या शक्तींचा पोलिसांनी शोध घेवून कठोर कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या.
शिवसेना पदाधिकार्यांकडून पिस्टल व तलवार रोखून हल्ला : अॅड.रोहिणी खडसे
पिस्टल व तलवार रोखत अॅड.खडसेंवर हल्ला
चांगदेव येथे भगवान भोई यांच्या मुलीचा हळद कार्यक्रमाला गेलेल्या अॅड.रोहिणी खडसे चालक सचिन पाटील, स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे, यांच्यासोबत फॉर्च्युनर (एम.एच. 19 सी.सी.1919) ने सोमवारी रात्री साडेसात वाजता या कोथळीमार्गे मुक्ताईनगराकडे येत असताना मानेगाव फाटा सोडल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर अचानक तीन दुचाकीवरून आलेल्या संशयीतांनी हल्ला चढवला होता. संशयीतांनी आधी फॉर्च्युनर वाहनापुढे तीन दुचाकी आडव्या लावल्या. यावेळी सुनील काशीनाथ पाटील याने वाहनाच्या डाव्या बाजूने येवून पिस्टल रोखले तर चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्या हातात तलवार चकाकाली तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. आरोपींनी आपण बसलेल्या दिशेने काचेवर जोरात आघात केल्याने काच फुटला तसेच बोनटचे मोठे नुकसान झाले. या प्रकारानंतर चालकाने तातडीने तेथून गाडी काढल्याने पुढील अनर्थ टळला.


शिवसेना पदाधिकार्यांसह सात आरोपींविरोधात गुन्हा
अॅड.रोहिणी खडसे यांच्या फिर्यादीनुसार, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील व चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्यासह अन्य चार अनोळखींविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी भादंवि 307, आर्म अॅक्ट 3/25, दंगल आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
