बनावट नोटा चलनात आणणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
औरंगाबाद : बनावट नोटा चलनात आणणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 500, 100 आणि 50 रुपयांच्या तब्बल 1 लाख 20 हजाराचे बनावट चलन जप्त करण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
औरंगाबाद शहरात बनावट नोटा चलनात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना सोमवारी खबर्यामार्फत मिळाली होती. यावरून मंगळवारी सायंकाळी पुंडलिकनगर रोडवरील एका वाईन शॉपवर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी रघुनाथ ढवळपुरे यास पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत समरान उर्फ लक्की रशीद शेख (30, जसवंत नगर) हा बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. लक्की उच्च शिक्षित असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. नितीन चौधरी (25, मुकुंदवाडी) याच्या मदतीने मुकुंदवाडी येथे रूम किरायाने घेऊन लक्कीने बनावट नोटा छापणे सुरू केले. अक्षय आण्णासाहेब पडूळ (28, गजाजन नगर) व दादाराव पोपटराव गावंडे (42 , गजानन नगर ) यांच्या मार्फत बनावट नोटा बाजारात चलनात आणल्या जात होत्या. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एक लाख 20 हजारांच्या नोटा जप्त
पोलिसांनी मुकुंदवाडी येथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकला. येथून ऑलइनवन प्रिंटर , कटर, कागद, कार जप्त केले. पोलिसांनी लक्कीसह इतर तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे 1 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त दीपक गीर्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढूमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहा.निरीक्षक शेषराव खटाने, एएसआय रमेश सांगळे, बाळाराम तौर, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, दीपक जाधव, राजेश यदमळ, कल्याण निकम, प्रवीण मुळे, कोमल तारे, प्रशांत भगरे यांनी केली.
