बेरोजगार तरुणांना मोठी संधी : राज्य पोलिस दलात 50 हजार पदे भरली जाणार
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा
मुंबई : पोलिस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करणार असल्याची घोषणा राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
लवकरच सुरू होणार प्रक्रिया
मुंबईत विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्यांवरून सत्ताधार्यांवर निशाणा साधण्यात आला. अमरावती हिंसाचार्याच्या घटनेवरून विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, शेवटच्या दिवशी गृह विभाग आणि पोलिस दल यांसदर्भातील पार पडलेल्या चर्चेवेळी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सध्या राज्यात पहिल्या टप्प्यातील 5 हजार 200 पदांची भरती सुरू आहे. दुसर्या टप्प्यातील 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. राज्यातील पोलिसांची संख्या कमी आहे. आम्ही पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात निर्णय घेऊन पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.


