पुण्यात महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या
पुणे : पुणे शहर पोलिस दलाच्या (Pune Police) गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पोलिस निरीक्षक असलेल्या शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील राहत्या घरी चव्हाण यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार शुक्रवार, 31 रोजी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पोलिस दलात उडाली खळबळ
गुन्हे शाखेत नेमणूक होण्यापुर्वी शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan) या पुणे शहर पोलिस (Pune Police) दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ? हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.


