50 रुपयांसाठी पित्याने घेतले मुलाचे प्राण


ठाणे : घरातून 50 रुपये चोरल्याने पित्याने केलेल्या बेदम मारहाणीत 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी पित्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. करण संदीप प्रजापती (10) असे मयत मुलाचे तर संदीप उर्फ बबलू प्रजापती असे आरोपी पित्याचे नाव आहे. दरम्यान, आरोपी पित्याला न्यायालयाने 5 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जबर मारहाणीत मुलाचा मृत्यू
कळव्यातील वाघोबानगर, ठाकुरपाडा झोपडपट्टी येथे संदीप उर्फ बबलू प्रजापती हा पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. 29 डिसेंबर रोजी दुपारी त्याचा मुलगा करण याने घरातून पन्नास रुपये चोरले होते. ही बाब समजल्यानंतर त्याने मुलास जबर मारहाण केली. याच अमानुष मारहाणीत त्याच्या दोन्ही हाताला, पायाला फ्रॅक्चर झाले. तसेच डोक्याचीही कवटी फुटल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतरही या निर्दयी पित्याने त्याला घरातच एका चादरीत गुंडाळून ठेवले. नंतर त्यास घरात कोंडून दरवाजा बंद ठेवला. हा प्रकार 29 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

कळवा पोलिसांची घटनास्थळी धाव
परीसरातील नागरीकांनी या घटनेची खबर दुसर्‍या दिवशी कळवा पोलिसांना दिली. 12 तासांहून अधिक काळ मुलगा घरात बेशुद्ध अवस्थेत बंद असल्याची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, सुदेश आजगावकर, जितेंद्र कुंवर आणि उपनिरीक्षक किरण बघडाणो आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा घरातच या मुलाला चादरीत गुंडाळल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले असता, तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !