यावल शहरात भरधाडन्य खरेदीचा शुभारंभ
यावल : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यावल तालुक्यात शासकीय भरड धान्य खरेदी केंद्रावर आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते रविवारी काटा पूजन करून खरेदीचा शुभारंभ केला. प्रसंगी पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, तहसीलदार महेश पवार उपस्थित होते.
यांची कार्यक्रमाला उपस्थिती
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र फेडरेशनचे तालुका उपअभिकर्ता असलेल्या तालुक्यातील कोरपावली विकासोच्या वतीने येथील शासकीय गोदाम आवारात शासकीय भरड धान्य खरेदीचा आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते काटा पूजन करून शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी दहिगावचे शेतकरी सुधाकर महाजन, कोरपावलीचे शेतकरी त्र्यंबक चौधरी यांचा खरेदी केंद्रावर आमदार चौधरी यांचे हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरपावली विकासो चेअरमन राकेश फेगडे यांनी केले. खरेदी केंद्रास ज्वारी खरेदीचे 51 हजार, मका 35 हजार तर बाजरी 500 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे मात्र अभिकर्ता यांच्याकडे ज्वारी साठी 891 शेतकर्यांनी तर मकासाठी दोन हजार 738 तर बाजरीसाठी केवळ पाच शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत शेतकर्यांची नोंदणी अत्यल्प असल्याचे विकास चेअरमन राकेश फेगडे यांनी सांगितले आहे. कार्यक्रमास बाजार समिती चे संचालक नारायण चौधरी, डांभुर्णी सरपंच पुरुजीत चौधरी, कदिरखान, अनिल जंजाळे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.
शिवसेनेचा बहिष्कार
बाजार समीतीचे सभापती पद शिवसेनेकडे असल्याने सभापती तुषार पाटील हे बाजार समीती प्रतिनिधी म्हणून निमंत्रित होते. मात्र तालुका शिवसेना पदाधिकार्यांना कार्यक्रमास निमंत्रित केले नसल्याने राज्यात महाआघाडीचे शासन असताना शासनातील महत्वाचा घटक असलेल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिका-याना कोणत्याही शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याचा आरोप तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, सुनिल बारी, शरद कोळी, संतोष खर्चे., कडू पाटील, सागर देवांग यांच्या सह अनेक , कार्यकर्त्यांनी घोषणा देत कार्यक्रम स्थळी येऊन तहसीलदार पवार यांचे वर पक्षपातीपणाचा आरोप करत व त्यांना निवेदन सादर केले व कार्यक्रम स्थळावरून बाजार समितीचे सभापती तुषार पाटील यांना सोबत घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निघून गेले .


