मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahapalika) हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर (Property Tax) माफ करण्यास मंत्री मंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
मालमत्ता कर माफीने दिलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारी, 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार 46.45 चौ.मी. (500 चौ. फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते. मंत्री मंडळाच्या मंजुरीनुसार आता या निर्णयाची 1 जानेवारी 2022 पासून अंमलबजावणी होणार आहे.

462 कोटींच्या महसुलात येणार घट
या निर्णयामुळे मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika) क्षेत्रातील 16.14 लाख निवासी मालमतांना या संपूर्ण कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. या सवलतीमुळे महापालिकेच्या कर महसुलात सुमारे 417 कोटी आणि राज्य शासनाच्या महसुलात सुमारे 45 कोटी असा एकूण 462 कोटींचा महसूल कमी होणार आहे.
