शाळा, महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा बंद : पालकांमध्ये पसरली चिंता


शिंदी, ता.भुसावळ : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा निर्बंध लावण्यात आल्याने शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्बंध लागू झाल्याने पालक वर्गाची चिंता वाढली आहे. ओ मायक्रोनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. सुमारे पावणे दोन वर्षापासून विद्यार्थी ग्रामीण भागात घरीच असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत होते मात्र काही दिवसांपूर्वी शाळा हळूहळू का होईना पुन्हा सुरू झाल्या व विद्यार्थ्यांसह पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असताना पुन्हा त्यांचा शाळा बंद झाल्याने भ्रमनिरास झाला आहे.

विद्यार्थी पुन्हा शाळेपासून दुरावला
काही दिवसांपूर्वी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू होते. त्यानंतर हळूहळू पाचवी ते सातवी व इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले. त्यातच शहरी भागातील शाळा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील मुले शहरातील शाळेकडे येऊ शकत नव्हती मात्र पुन्हा आता राज्यात सर्वत्र सरसकट शाळा-महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद झाल्याने पुन्हा विद्यार्थी शाळेपासून दुरावला आहे. इयत्ता पाचवीची वार्षिक परीक्षा न दिलेला विद्यार्थी सातवीच्या वर्गात आता कुठे येऊन बसत होता. वयानुसार पहिलीचा वर्ग न पाहिलेला विद्यार्थी दुसरीची वार्षिक परीक्षा लवकरच देणार आहे. परीणामी विद्यार्थ्यांचे लिखाण, अंकज्ञान, अक्षरज्ञान लिखाणाची गती, सामान्य ज्ञान यामध्ये ग्रामीण विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मागे पडत आहे, असे स्पष्ट मत काही पालकांनी व्यक्त केले त्यामुळे ज्या भागामध्ये कोरोना किंवा ओमायक्रोन रुग्ण नाहीत अशा ग्रामीण भागातील किंवा मध्यम शहरी भागातील शाळा सुरू ठेवल्या जाव्यात तसेच सरसकट शाळा-महाविद्यालये, क्लासेस बंद करू नये, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !