माजी मंत्री गुलाबराव देवकरांना कोरोना
जळगाव : जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर (Gulabrav Deokar) यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी त्यांना जाणवू लागताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझीटीव्ह (Corona Positive) आल्याने मात्र लक्षणे सौम्य असल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर घरीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
कार्यकर्त्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन
गेल्या दोन दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देवकर (Gulabrab Deokar) यांनी केले आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण
ठाकरे सरकारमधील 25 हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. दैनंदिन कामकाजामुळं होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळं लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, नितीन राऊत, सुनील केदार, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, अनिल परब, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, छगन भुजबळ यांच्यासह काही राज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती तर दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली तर आता माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrav Deokar) यांनाही कोरोनाची (Corona Positive) लागण झाल्याचे समोर आले आहे.
