कंडारी सरपंचांना मोठा दिलासा : अपात्रता आदेश रद्द


भुसावळ : तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत सरपंचांना जिल्हाधिकार्‍यांना अपात्र ठरवले असलेतरी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आलेल्या अपिलात त्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्हाधिकार्‍यांचे आदेश आयुक्तांनी रद्द ठरवले आहेत. ग्रामपंचायत कराची रक्कम मुदतीत भरली नाही म्हणून कंडारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नितीन कोळी यांना ग्रामपंचायत सदस्य दीपक तायडे यांच्या तक्रारीवरुन जिल्हााधिकार्‍यांनी अपात्र ठरवले मात्र हा आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी रद्द ठरवला आहे.

कंडारी सरपंचपद कायम
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी अपात्र केले होते. या निर्णयाविरोधात कोळी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले. यावर अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी कोळी यांना दिलासा देत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश रद्द केला आहे. यामुळे कंडारी सरपंचपदी सुवर्णा कोळी कायम राहणार आहेत.

तक्रार प्रकरणी अपात्रतेचे आदेश
कंडारी ग्रामंपचायतीच्या सरपंच सुवर्णा कोळी जानेवारी 2021 मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आरक्षणानंतर त्यांची सरपंच पदी वर्णी लागली होती. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य दीपक तायडे यांनी सरंपच कोळी यांनी मालमत्ता कराची रक्कम मुदतीत न भरल्याने त्यांना अपात्र करण्याची तक्रार केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकार्‍यांनी 21 सप्टेंबर रोजी अपात्रतेचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात सरपंच कोळी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे धाव घेत अपिल दाखल केले होते. या सुनावणीत सरपंच कोळी राहत असलेल्या मालमत्ता घर क्रमांक 384 ही मालमत्ता त्यांचे सासरे रामराव नामदेव कोळी यांच्या नावे आहे. या मालमत्तेचा थकीत कर भरणा 29 डिसेंबर 2020 पर्यंत भरणे आवश्यक होते मात्र त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 30 डिसेंबर 2020 रोजी भरणा केला. याबाबत तक्रारदारांनी निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत हरकत घेणे अपेक्षीत होते मात्र तक्रारदारांनी या प्रकरणी 24 मार्च 2021 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे अपात्रता याचिका दाखल केली. आदींसह विविध मुद्यांवर सुनावणीनंतर अपर आयुक्त भानुदास पालवे यंनी अपिलार्थी कोळी यांचे अपिल मान्य करीत जिल्हाधिकार्‍यांनी 21 सप्टेंबर रोजी दिलेला आदेश रद्द केला. यामुळे कंडारीच्या सरपंचपदी आता सुवर्णा कोळी या कायम राहणार आहेत. अपिलार्थीतर्फे अ‍ॅड.बी.डी.गोमोट यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड.राजेंद्र राय, अ‍ॅड.धनराज मगर यांनी काम पाहिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !