संततधार पावसाने नाडगावमध्ये घर कोसळले
बोदवड : तालुक्यात सलग 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील नाडगाव येथील सारगंधर रंजनसिंग पाटील व पानकाबाई व्यकंटराव पाटील यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या. या घटनेमुळे घरातील अनेक संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली. सारंगधर पाटील व त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थांना घटना लक्षात येताच त्यांनी घरातील सदस्यांना बाहेर काढले. या दुर्घटनेत सारंगधर पाटील यांच्या घराचे अंदाजे 80 हजारांचे तर पानकाबाई पाटील यांचे अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.