अवैध उत्खनन प्रकरणी : महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाला चार कोटी 86 लाखांचा दंड
बोदवड : तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध उत्खनन करीत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी केली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार रवींद्र जोगी, तहसीलदार हेमंत पाटील व तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी पाचपट दंडात्मक कार्यवाही न करता स्वामित्वधनाच्या रकमा भरून घेतल्या होत्या. जळगाव जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती. या समितीने महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारक यांनी 4294.21 ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला असल्याने गौण खनिजाकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी बोदवड तहसीलदारांना आदेश दिले आहे. चार कोटी 86 लाख 29 हजार 771 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आदेशामुळे उडाली खळबळ
तीन तहसीलदारांच्या बदल्यानंतर महसूल प्रशासनाकडून मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये बोदवड तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी आदेश काढले आहेत. अवैध उत्खनन केल्याप्रकरणाच्या तक्रारी दाखल केल्यानंतर तत्कालीन तहसीलदार रवींद्र जोगी, तहसीलदार हेमंत पाटील यांनी दंडात्मक कार्यवाही न करता वेळोवेळी स्वामित्वधनाच्या रकमा भरून घेतल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्त समिती गठीत केली. यानंतर तत्कालीन तहसीलदार प्रथमेश घोलप यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार नुतन तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी चार कोटी 86 लाख 29 हजार 771 रुपयांचा दंड ठोठावल्याचा आदेश काढला आहे. तब्बल तीन तहसीलदारांच्या बदल्यानंतर तसेच दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तक्रारी निकाली निघाल्या आहेत.


