स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय : सात महिलांची सुटका
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करीत सात पीडित महिलांची सुटका केली. डांगे चौक, लिंक रोड, वाकड येथे सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शुभांकर महेश जवाजीवार (27, रा.जुना बाजार, खडकी, पुणे), रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे (43, रा. काळेवाडी फाटा, वाकड, मूळ रा.धरणगाव, जिल्हा जळगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस कर्मचारी संगीता जाधव यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक येथील एलेमेंट्स द फॅमिली स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यात सात पीडित महिलांची सुटका केली. आरोपी हे पीडित महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते, असे फिर्यादीत नमूद आहे.

