कोळशाने भरलेला ट्रक उलटून तीन चिमुकल्यांचा मृत्यू


भिवंडी : वीटभट्टीवर लागणारा दगडी कोळसा हायड्रॉलीक हायवा ट्रक मधून खाली केला जात असताना ट्रकच्या मागील बाजूच्या ट्रॉलीचा कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने संपूर्ण मागील ट्रॉली कोळशासह वीटभट्टी मजुराच्या गवताच्या झोपडीवर पडल्याने झालेल्या अपघातात आदिवासी मजुराच्या झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्यां मुलींचा कोळशाच्या ढिगार्‍याखाली दाबल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी टेंभिवली गावात घडली. दुर्घटनेत बाळाराम कान्हा वळवी या आदिवासी वीटभट्टी मजुराच्या लावण्या (7), अमिषा (6), प्रीती (3) वर्ष या तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ट्रक चालकासहीत चौघांविरोधात गुन्हा
आदिवासी वीटभट्टी मजुरांच्या परीवारावर काळाने घात घातला असून वीटभट्टीच्या बाजूला बनविलेल्या गवताच्या झोपडीत झोपलेल्या मुलींच्या अंगावर कोळशाने भरलेला ट्रक उलटल्याने झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परीसरात शोककळा पसरली आहे. या घटनेला जबाबदार धरीत वीटभट्टी मालकांबरोबरच ट्रक चालकासह चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने अपघात
भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथील मोहिली येथील बाळाराम वळवी हा आपल्या पत्नी व चार मुलींसह वीटभट्टी मजुरी साठी आपल्या मुळगावाहून स्थलांतरीत होऊन तालुक्यातील टेंभिवली या गावात गोपीनाथ मढवी व त्यांचा मुलगा महेंद्र मढवी यांच्या वीटभट्टीवर मजुरी साठी आले होते. वीटभट्टी परिसरातच गवताच्या झोपडीत हे मजूर कुटुंब वास्तव्यास होते .त्याच्या झोपडी लगतच्या मोकळ्या जागेत वीटभट्टी पेटविण्यास आवश्यक असणारा दगडी कोळसा साठविला जात असे. नेहमी प्रमाणे कोळसा घेऊन आलेला भलामोठा हायड्रोलीक हायवा ट्रक खाली करण्यासाठी मागील बाजू कडील ट्रॉली उचलली असता त्याखालील कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने ट्रॉली मधील कोळशासह ट्रॉली बाळाराम वळवी याच्या झोपडीवर पडल्याने झोपडीत एका कोपर्‍यात जमिनीवर झोपलेल्या तिघी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने बाहेर गेलेले बाळाराम व झोपडी बाहेर चुलीवर जेवण करणारी पत्नी व झोळीत झोपलेली दोन वर्षांची कीर्ती हे तिघे जण या अपघातातून बचावले आहेत. या प्रकरणी गोपीनाथ मढवी व व्यवस्थापक सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली तर दोन पसार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !