भुसावळातील अमृत योजनेला गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक लावावी
भुसावळ आमदार संजय सावकारे यांचे निवेदनाद्वारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे
भुसावळ : भुसावळातील अमृत योजनेला गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक लावावी याबाबत आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून साकडे घातले.
बैठक घेण्याचे आश्वासन
भुसावळ नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी अमृत योजनेसंदर्भात नुकतीच एक बैठक घेतली. त्या बैठकीला प्रशासकीय अधिकारी मुख्य अधिकारी विभागीय अधिकारी यांची मते जाणून घेतली त्यानुसार भुसावळ येथील अमृत योजनेसाठी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात तसेच अमृत योजने संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लावावे व योजनेला गती मिळावी यासाठी आमदार संजय सावकारे यांनी गुरुवार, 27 जानेवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना अमृत योजनेसंदर्भात मंत्रालयात विस्तृत बैठक लावावी व भुसावळ येथील पाणीपुरवठा योजनेला गती मिळावी या संदर्भात भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी एका पत्राद्वारे पालकमंत्री महोदयांना निवेदन दिले आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनी त्वरीत बैठक लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
शहरातील योजना कार्यान्वीत होण्याची आशा
भुसावळ शहरातील पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला आहे. प्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी साकेगाव कंडारी गावासाठी मंजूर असलेल्या जल जीवन मिशन योजनेचे तांत्रिक मान्यता पत्र आमदार संजय सावकारे यांना सुपूर्द केले व योजना उत्कृष्टरीत्या राबवली जाईल, असा विश्वास प्रसंगी आमदार सावकारे यांनी व्यक्त केला आहे.


