32 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त : मुकटी शिवारात धुळे तालुका पोलिसांची कारवाई
धुळे : तालुक्यातील मुकटी शिवारात धुळे तालुका पोलिसांनी (dhule taluka police) सापळा रचून अवैधरीत्या विदेशी अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या सुमारे 32 लाखांचा मद्यसाठा जप्त केला तर 18 लाख रुपये किंमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली. दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून तालुका पोलिसात (dhule taluka police) गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
ट्रक (क्र.एम.पी.०९ एच.एफ.९९९१) अवैधरित्या मध्यप्रदेश येथील खलघाट येथून विदेशी दारूची नवापुर (जि.नंदुरबार) येथे चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (pi hemant patil) यांना मिळाल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुकटी परीसरात वाहनाचा शोध सुरू केला. हॉटेल माँ करणी येथे पहाटे पाच वाजेच्या सुमारास ट्रक येताच वाहन चालक पप्पुसिंग रघुनाथसिंग दोडीया (35, रा.उनी ता.जावरा, जि.रतलाम, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. वाहनांची तपासणी केली असता त्यात ऑल सिझन्स कंपनीची विदेशी दारूचे एकूण २५५ बॉक्स मिळून आले तसेच ट्रकची वाहतुक करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या स्कार्पिओ वाहनाला (क्र.जी.जे.०६ सी.एफ.२१३३) देखील पकडण्यात आले. या वाहनावरील तौसीमोहीन रशीदरभाई शेख व उमेश दुर्गादास वसावा (रा.नवापुर जि.नंदुरबार) यांना देखील ताब्यात घेण्यात आले. ३२ लाख ७४ हजार रुपये किंमतीची ऑल सिझन्स कंपनीची गोल्डन कलेक्शन रिझर्व व्हिस्की विदेशी दारु (एकूण २५५ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये ७५० मिली क्षमतेच्या १२ सीलबंद बाटल्या) १० लाख रुपये किंमतीचा ट्रक व ८ लाख रुपये किंमतीचे स्कार्पिओ वाहन असा एकूण ५० लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात बंदी असलेली विदेशी दारु ही मध्यप्रदेश येथून नवापुर येथे पिंटू उर्फ गोरख भिमराव गढरी (रा.नवापुर) याच्याकडे अवैध विक्रीसाठी वाहतुक करून घेवून जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी दारु पुरवठा करणारे, वाहतुक करणारे, सहाय्य करणारे व माल घेणारा अशा एकूण ६ इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी का.क.६५(ई).(अ), ८०(२)(४),८३,१०८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (dhule sp pravinkumar patil), अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक भुषण कोते, पोलिस उपनिरीक्षक सागर काळे, प्रवीण पाटील, सोमनाथ कांबळे, योगेश पाटील, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, भुषण पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील, चालक प्रकाश भावसार यांनी केली.

