शिक्षकी पेशाला काळीमा : लग्नाच्या तगाद्याला वैतागून तरुणीची आत्महत्या
मुरगूड : पेशाने शिक्षक असलेल्या आरोपी शिक्षकाने सातत्याने लग्नासाठी तरुणीमागे तगादा लावल्याने तरुणीने विष प्राशन करीत आत्महत्या केली. आकांक्षा तानाजी सातवेकर (29) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी संशयीत आरोपी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे. अर्जुनवाडा, ता. कागल येथे ही घटना घडली.
सोशल मिडीयाद्वारे लावला तगादा
अर्जुनवाडा येथील रहिवाशी पण मुगळी, ता.कागल येथील एका शाळेमध्ये अमित कुंभार हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो आकांक्षा हिला फोन करून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी त्रास देत होता. गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिलासा तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन हा आणि असेच संदेश तो पाठवत होता. त्याच्या या वारंवार त्रासाला कंटाळून आकांशाने 22 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे.

